मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही!
मुंबई : महाविकास आघाडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्याबाबतच्या चर्चांना जोर असतानाच, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ मनसेला सोबत घेण्यावरुन काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नसल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर मनसेला सोबत घेण्याबाबत सकपाळ यांनी आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही, असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मनसेकडे याबाबत अजून प्रस्ताव दिलेलाच नसल्याचे म्हटलं.
संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आणि इतिहासावर बोट ठेवले. पण अजून हा प्रस्ताव दिलेलाच नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव हा त्या त्या पक्षाचा प्रश्न असतो. त्यांचा (काँग्रेस) राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांच्या विविध कमिट्या असतात. आमच्याकडे किंवा राज ठाकरेंकडे तशा प्रकारची पद्धत नाही. आम्ही लगेच निर्णय घेतला आणि पुढे गेलो. तो खूप मोठा पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीतील पक्ष आहे आणि आजही तो त्याच काळात वावरत आहे, असं संजय राऊत म्हणाले. म्हणजेच निर्णय घेण्यासाठी काँग्रेसला खूप वेळ लागतो, असा सूचक अर्थ त्यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड गती मिळाली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची वारंवार भेट घेतली आहे. अलीकडेच ते उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर जाऊन त्यांना भेटले होते. या भेटी केवळ कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत असे दोन्ही बाजूंकडून सांगितले जात असले तरी, आगामी राजकीय समीकरणे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी अंतर्गत चर्चा सुरू असल्याची कुजबूज आहे.
संजय राऊत यांच्या आजच्या विधानामुळे मनसेला सोबत घेण्याचा निर्णय उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पातळीवर जवळजवळ निश्चित झाला आहे. मात्र काँग्रेसने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष या प्रस्तावावर काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र येण्याबद्दल नकारात्मक भूमिका नाही - संजय राऊत
शरद पवार आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रावर आक्रमण सुरू आहेत. ते पाहता प्रत्येक मराठी नेत्याची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पाळली पाहिजे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधील महाराष्ट्रातील पुढारी या लढाईत कुठेच मागे राहणार नाहीत. महानगरपालिकेतील जागावाटप फक्त हाच प्रश्न नाहीये. मतदार यादीतील घोटाळा महाराष्ट्रातील माणसांची पीछेहाट करण्यासाठी केलेला आहे. तसेच यापैकी एकाही पक्षाने आम्ही एकत्र येण्याबद्दल नकारात्मक भूमिका घेतलेली नाही, असंही संजय राऊत म्हणाले.